IMG-LOGO
महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक : शिवसेना-भाजपत रस्सीखेच, राष्ट्रवादी तिस-या तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर

Monday, Jan 18
IMG

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीही राखता आल्यान नाहीत, तर भाजप नेते नितेश राणे आणि प्रा. राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायती निसटल्या आहेत.

धनुष्यबाणः 1921, कमळः 1900, घड्याळः 1705, हात-1364, रेल्वे इंजिन-31, अन्य-1774मुंबई, दि. १८ जानेवारी :  राज्यात झालेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींपैकी आठ हजार 695 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या निकालानुसार शिवसेना पहिल्या क्रमांकावर असली, तरी भाजप आणि शिवसेनेत पहिल्या क्रमांकासाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तिसर्‍या, तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. मनसेचे रेल्वे इंजिन यवतमाळ, नगर आणि मुंबईनजीकच्या काही ग्रामपंचायतीत धावले आहे.भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काहीही दावे केले असले, तरी पुढच्या महिन्यांत जेव्हा सरपंचपदाचे आरक्षण निघेल आणि सरपंच, उपसरंपच कोणत्या पक्षाचे होतात, त्यानंतर किती ग्रामपंचायती, कोणत्या पक्षाच्या ताब्यात आल्या, हे सांगता येईल. आता मात्र सर्वांनीच आपल्या विजयाचा दावा केला आहे. शिवसेना आता काही भागापुरती उरली असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी त्यांच्या विदर्भात भाजपची स्थिती काय झाली, हे त्यांना माहित झाले नसावे. दोन्ही माजी प्रदेशाध्यक्षांच्या गावात भाजपला चपराक बसली. विदर्भात भाजपला काँग्रेसने धूळ चारली. गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, प्रा. राम शिंदे आदींच्या गावात मतदारांनी या नेत्यांवरच अविश्‍वास दाखविला. दुसरीकडे पोपटराव पवार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पॅनेल अनुक्रमे हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धीत विजयी झाले. राज्यातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांचे पॅनेल पराभूत झाले. 25 वर्षांची त्यांची सत्ता गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मेहुणे आणि त्यांचे पाहुणे पराभूत झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीही राखता आल्यान नाहीत, तर भाजप नेते नितेश राणे आणि प्रा. राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायती निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. कोल्हापुरातील खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचे मूळगाव आहे; पण खानापूर ग्रामपंचायतीतील शिवसेनेने नऊ पैकी सहा जागा जिंकल्या आहेत. शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरातच पराभूत केल्याने पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे; परंतु मी काही एका गावापुरता मर्यादित नाही, असे सांगून त्यांनी सारवासावर केली. पाटील आणि केशव उपाध्ये यांनी भाजपला सहा हजार ग्रामपंचायती मिळतील, असा दावा केला. तो फोल ठरण्याचीच शक्यता आहे. त्याचे कारण नऊ हजार ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण झाली असून अजून पाच हजार ग्रामपंचायतींचे निकाल हाती यायचे आहेत. भाजपला मिळालेल्या ग्रामपंचायतींची संख्या पाहता अजून चार हजार शंभर ग्रामपंचायती ताब्यात येणे शक्य दिसत नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने प्रवेश केला आहे. चंद्रपूर येथील एका ग्रामपंचायतीत वंचितला बहुमत मिळाले आहे, तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे 34 उमेदवार निवडून आले आहेत. मुनंगटीवार यांच्या बल्लारपूर मतदारसंघात विसापूर हे गाव आहे. चंद्रपूरपासून अवघ्या 12 किलोमीटरवर हे गाव आहे. 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत वंचित आघाडीने 9 जागांवर विजय मिळवला. मुनंगटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचे पॅनेल उतरवले होते. विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. तिथे त्यांना सत्ता मिळाली. राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पाटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले; मात्र यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. नागपुरात काँग्रेसला 53 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीला 21 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची पकड दाखवून दिली आहे. शिवसेनेला फक्त दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. भाजपला 29 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील सात पैकीसहा ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ऐन मतदानाच्या तोंडावरच मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले. त्यामुळे टेन्शनमध्ये आलेल्या मुंडे यांना मतदान प्रक्रियेकडे लक्षही देता आले नव्हते; मात्र या कसोटीच्या काळात परळीतील जनतेने मुंडे  यांच्या हाती सत्ता देऊन त्यांच्यावर विश्‍वास टाकला आहे. बीडमधील 129 ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत. त्यापैकी 32 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. 31 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत, तर 39 ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. दिल्लीच्या आम आदमी पक्षाने आता महाराष्ट्रात खाते खोलले आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपचे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी मराठीत ट्विट केले आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालवण ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मालवणमधील सहा पैकी पाच ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. देवगडमध्ये भाजपने 23 पैकी 17 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे नाईक यांच्यासह शिवसेनेलाही हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

Share: