IMG-LOGO
महाराष्ट्र

लोकशाही वाचवण्यात महाराष्ट्रातील जनतेची भूमिका महत्त्वाची; महाविकास आघाडीने घेतली पत्रकार परिषद

Saturday, Jun 15
IMG

पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

मुंबई, दि. १५  : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. तर, महायुतीच्या (Mahayuti) पक्षांची चांगलीच पिछेहाट झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये चांगला उत्साह दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आणि सर्वच छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे आभार मानले. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, अनिल देसाई उपस्थित होते. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आमची लढाई 4 पक्षांविरुद्ध होती. चौथा पक्ष म्हणजे फेक नेरेटीव्ह होय. चुकीचं कथानक तयार करुन प्रचार केला, संविधान बदणार आहेत, असा खोटा प्रचार निवडणूक काळात करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. यासंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्त्युत्तर दिलं. यांना मतं दिली तर हे तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, मंगळसुत्र उचलून नेतील, तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापतील हे काय खरं नेरेटीव्ह होतं का, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. त्याचवेळी, बाजूला असलेल्या शरद पवारांनी म्हशीची आठवण करुन दिली. तुमची म्हैश चोरुन नेतील, हे काय खरं नेरेटीव्ह होतं का, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या आरोपावर जशास तसे प्रत्युत्तर दिले. नकली सेना, नकली संतान, प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घरे देईन, उद्योगधंदे येतील, हे खरं नेरेटीव्ह होतं का, असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे भविष्यात एनडीसोबत जातील, या रवी राणा यांच्या विधानावर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा रवी राणांचे नाव ऐकून त्यांनी सुरुवातीला चला जाऊदे म्हणत उत्तर देणे टाळले. पण उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएसोबत येतील, असे नेरेटीव्ह तयार होत असल्याचे उद्धव ठाकरेंना सांगण्यात आले. 'मला समजा जायचंय. तर यांच्यात बसून आता हो सांगू? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला.' यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. शरद पवार यांनी म्हटले की, आमच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. ती म्हणजे, महाराष्ट्रात ज्या काही अन्य पक्षांच्या सभा झाल्या, देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा आणि रोड शो झाला त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे आता  विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढं आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने स्पष्ट वाटचाल होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

Share: