IMG-LOGO
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा सरकारकडून खून

Saturday, Dec 26
IMG

मराठा समाजाच्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात विविध मराठा संघटनांनी आक्रमक पावित्रा स्वीकारत राज्य सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचा आरोप; आरक्षणाच हक्क जात नसल्याचे चव्हाण यांचे स्पष्टीकरणपुणे, दि. २६ डिसेंबर :  सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी म्हणून राज्य सरकारने ईडबल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु सरकारच्या या निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हे आरक्षण देऊन आमच्यासाठी व्यापक स्वरूपात व अधिकृतरित्या मिळणा-या  आरक्षणाचाच खून करण्याचे काम केले आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. दरम्यान, या लाभामुळे कोठेही संभ्रम व्हायचे कारण नाही, असे स्पष्टीकरण मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी दिले आहे. पत्रकार परिषदेत मोर्च्याच्या पदाधिका-यांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, राष्ट्र सेवा समूहाचे राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, मराठा महासंघाचे अनिल मारणे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या शशिकला भोसेकर, श्रीमंत कोकाटे, उत्तम कामठे आदी उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात विविध मराठा संघटनांनी आक्रमक पावित्रा स्वीकारत राज्य सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. मराठा समाजाने आम्हाला ’ईडब्ल्यूएस’आरक्षण द्या अशी कधीही मागणी केली नव्हती; पण सरकारने याद्वारे संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक केली आहे. यात महत्वपूर्ण बाब म्हणजे आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणार्‍या 42 तरुणांचा अपमान या आघाडी सरकारने केला आहे, अशी संतप्त भूमिका मराठा समाजाच्या नेत्यांनी मांडली आहे. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून दूर लोटणारा असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाचा या निर्णयाला विरोध असून शासनाने आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, ईडब्लूएस आरक्षण घेतल्यास न्यायप्रविष्ट असलेल्या मराठा आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी भीती काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत मराठा उपसमितीचे प्रमुख आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. म्हणाले, की मला वाटत कुठेही संभ्रमाचा प्रश्‍न नाही. संभ्रमी वातावरण निर्माण करण्याचा हेतुपरस्पर प्रयत्न केला जात आहे. जे पात्र उमेदवार आहेत, जे एसईबीसीमध्ये असून नियुक्त्या रखडल्या होत्या, त्यांनी सरकारकडे विनंती केली, की आमच्या नियुक्त्या कराव्यात. ज्यामध्ये न्यायालयाचा अवमान होणार नाही तसेच पर्याय निघेल. त्यानुसार सकारात्मक पाऊल उचलले आहे. 2145 उमेदवारांना सरकारने ईडबल्यूएसचा मार्ग मोकळा केला आहे. ईडबल्यूएसचा कायदा केंद्र सरकारचा आहे. त्यासाठी या वर्गातून आरक्षण घेताना काही उत्पन्नच्या अटी, शर्ती घातलेल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी निवडलेले आहेत, व ईडबल्यूएस निकषांमध्ये येतात, ज्यांना ईडबल्यूएसची सवलत घ्यायची आहे, त्यांना ही सवलत ऐच्छिक ठेवली आहे. ज्यांना ईडबल्यूएस घ्यायचे आहे, त्यांनी ती घ्यावी, ज्यांना एसईबीसी वाट पाहायची आहे त्यांनी वाट पाहावी, असे चव्हाण म्हणाले. नियुक्त्यांचा निर्णय प्रलंबितईडबल्यूएस निकषात बसतात, त्यांना यातून निवड झाल्यानंतर नियुक्ती देण्याबाबत प्रक्रिया शासन तपासून पाहात आहे. याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. या विद्यार्थ्यांना लवकर कसे यामध्ये समावून घेता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. जे ईडबल्यूएसमध्ये बसणार नाहीत अर्थात ते ओपन कॅटेगिरीमध्ये प्रयत्न करू शकतात. त्यात एकंदरीत पूर्ण यादीवर काय परिणाम होतो हे सगळे तपासण्यासाठी प्रक्रिया अवलंबली आहे. त्याला काही कालावधी लागू शकतो,  अशी माहिती चव्हाण यांनी दिली. जास्तीत जास्त उमेदवारांना पर्यायी मार्गाने जाता येऊ शकते का, हे तपासले जात आहे. आता यामध्येसुद्धा सर्वोच्च न्यायालयातील निकालावर हे सगळे आधारित राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

Share: