अर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. ’’मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल; संरक्षण समितीने दखल घेण्याची मागणीमुंबई, दि. १८ जानेवारी : रिपब्लीकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकची कुणकूण आधीच लागली होती, असा दावा लीक झालेल्या व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारावरून करण्यात आला आहे. यावरुन अर्णब गोस्वामी आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला असून संरक्षण समितीने याची दखल घेण्याची मागणी केली आहे. अर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. ’’मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.’’, असे टी्वट चव्हाण यांनी केले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअप चॅटवरुन देशाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न विचारले आहेत. तसेच, याप्रकरणी संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल होणार का, असा सवालही त्यांनी केला. ’’राष्ट्रीय सुरक्षा, लष्कराची गुपिते, महत्त्वाची माहिती अशा प्रकारे बाहेर येत असेल, तर तो राष्ट्रीय सुरक्षेला सर्वांत मोठा धोका आहे. आपण जणू काही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहोत, या थाटात हे चॅट समोर आले. याप्रकरणी देशाचे संरक्षणमंत्री, देशाचे गृहमंत्री यांनी आपली भूमिका मांडायला हवी. तसेच, राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली, तर महाराष्ट्राच्या अन् देशाच्या ज्ञानामध्ये भर पडेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला हा धोका आहे. जर सैन्यातील एखाद्या जवानाकडे महत्वाचा कागद जरी सापडला तरी त्याचे कोर्ट मार्शल होते; पण येथे तर पुलवामा आणि बालाकोटबद्दल अगोदरच माहिती होती. यावरून राष्ट्रीय सुरक्षेला छेद असल्याचे समोर आले. त्यामुळे, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री काय करणार? संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल करणार का? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान, 14 फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते; मात्र हा हल्ला होण्यापूर्वी 23 फेब्रुवारीच्या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती पार्थो दासगुप्ता यांना दिली होती.