प्रवासी डब्यांतील सीट काढून ती जागा मोकळी केली. त्यात दुचाकी व चारचाकी बसेल अशी जागा तयार केली.
पुणे, दि. १० मे : आयुर्मान संपलेल्या प्रवासी रेल्वे डब्यातून मालाची अति जलद म्हणजे ताशी 110 किलोमीटर वेगाने वाहतूक होणार आहे. नुकतेच अंबाला रेल्वे विभागात याच्या वेगाची चाचणी झाली. या वेळी गाडी ताशी 120 किलोमीटर वेगाने धावली. मुख्य संरक्षक आयुक्तांनी मात्र ताशी 110 किलोमीटर वेगाने गाडी धावण्यास मंजुरी दिली. लवकरच रेल्वे बोर्डाकडूनदेखील मंजुरी मिळेल. मग भारतात माल वाहतूकदेखील सुपरफास्ट गतीने होईल.रेल्वे मंत्रालयने आयुर्मान संपलेले प्रवासी डबे भंगारात न घालता त्याचा वापर दुचाकी व चारचाकी वाहनाची वाहतूक करण्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले. त्यानुसार एनएमजी (न्यू मॉडिफाय गूड्स ) डबे तयार करण्यात आले. आता यात आणखी बदल झाला असून एनएमजीएच डबे तयार करण्यात आले. देशात जवळपास दोन हजार डबे तयार करण्यात आले. याद्वारे वाहनाची वाहतूक रस्ते वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त, जलद व सुरक्षित होत आहे. शिवाय यामुळे इंधनाचीदेखील बचत होत आहे.प्रवासी डब्यांतील सीट काढून ती जागा मोकळी केली. त्यात दुचाकी व चारचाकी बसेल अशी जागा तयार केली. तसेच खिडक्या व दरवाजे बंद करण्यात आले. रेल्वे स्थानकावरदेखील विशिष्ट प्रकारचे रॅम्प तयार करण्यात आला. एका डब्यातून 15 टन मालाची वाहतूक होते. पूर्वी त्याची क्षमता 9.2 टन इतकी होती. तसेच डब्यांत लाईटची व्यवस्था करण्यात आली. दरवाज्याच्या रचनेत बदल झाला आहे. रेल्वेच्या परळ कार्यशाळेत मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक विवेक आचार्य यांनी यावर आणखी काम केले असून हे डबे 110 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी तयार केले आहेत. या वर्षी 100 डबे तयार केले जातील. परळमध्ये तयार केलेल्या डब्याप्रमाणेच आता भोपाळ, लखनऊ, अजमेर येथील कार्यशाळेत लवकरच अशा प्रकारचे डबे तयार केले जातील.चारचाकी व दुचाकीची वाहतूक करण्यासाठी सुरुवातीला एनएमजी डबे तयार केले गेले. आता हे डबे वेगवान बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे देशांतर्गत वाहनाची वाहतूक वेगाने होईल. लवकरच 110 किलोमीटर वेगाने गाडया धावणार असल्याचे मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.