IMG-LOGO
महाराष्ट्र

सरपंचपदाची बोली, हा लोकशाहीचा लिलाव

Friday, Jan 01
IMG

सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी पदांचे लिलाव झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यासंबंधी हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हजारे यांचे मत; व्यभिचारी, गुंड, भ्रष्टांचा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेशअहमदनगर, दि. १ जानेवारी : सरपंचपदाची बोली लावून लिलाव करणे हे म्हणजे लोकशाहीचा लिलाव करण्यासारखे झाले. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या लिलावपद्धीतीला विरोध केला; मात्र ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक करणे हा उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी पदांचे लिलाव झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यासंबंधी हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ज्या लोकशाहीसाठी 1857 ते 1947 या नव्वद वर्षांत लाखो लोकांनी तुरुंगात जाऊन, भूमिगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हालअपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची असे त्यांचे स्वप्न होते; मात्र सरपंचपदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे. 70 वर्षांत काही लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय, असा सवाल त्यांनी केला.  पंचायत राज मजबूत व्हावे, यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च आहे. ग्रामसभा ही गावची संसद असून ग्रामपंचायत (एक्झिक्युटिव्ह बॉडी) कार्यकारी मंडळ आहे. ग्रामपंचायत सरपंचपदाचा लिलाव झाला, तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसभा ही सार्वभौम असून स्वयंभू आहे. 18 वर्षांचे वय झाले, मतदान करण्याचा अधिकार आला, की प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सदस्य होतो. एकदा सदस्य झाला की मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामसभा ग्रामपंचायतीला निवडून देते. जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे, असे हजारे म्हणाले.बिनविरोध निवडचे समर्थनसध्या अनेक ठिकाणी बक्षिसे देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून मतमतांतरे होत असली, तरी हजारे यांनी मात्र याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक करून निवडणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गावात मतभेद होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडतात आणि पाच वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात गावाचा विकास होत राहतो.

Share: