तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते.
मुंबई, दि. १ जून : 'मुंबई सकाळ' चे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (82) यांचे आज सकाळी विलेपार्ले पश्चिम येथील कूपर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. कोरोनावर मात करून गेल्याच आठवड्यात ते सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधून घरी परतले होते. काल रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. वसई-विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. दैनिक `नवाकाळ'चे बातमीदार , दैनिक `सकाळ' चे संपादक , दैनिक `पुण्यनगरी' वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भूषविली आहेत. मुंबईतील दैनिक `सकाळ'च्या संपादक पदावरुन निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले `सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?' हे पुस्तक लोकप्रिय ठरले. त्यांनी लिहिलेले 'मनातली माणसं' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.