संसदेचं अधिवेशन संपल्यावर सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आरक्षणाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय? अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली. त्यावेळी मराठवाड्यातील परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या वादामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर यावेळी भाष्य केलं. “काल मला मराठा नेत्यांचं एक शिष्टमंडळ भेटून गेलं. आरक्षणाच्या बाबतीत कुणाचाही मतभेद असण्याचं कारण नाही. मला काळजी या गोष्टीची आहे की यामुळे दोन वर्गांमध्ये एक प्रकारचं अंतर वाढतंय अशी स्थिती दिसू लागली आहे. विशेषत: मराठवाड्यातल्या दोन-तीन जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे”, असं शरद पवार म्हणाले. “मला काही सहकाऱ्यांनी सांगितलं की तिथे एखाद्या ठिकाणी अमुक समाजाच्या व्यक्तीचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाच्या व्यक्ती तिथे जात नाहीत. हे जर खरं असेल तर ही स्थिती चिंताजनक आहे. हे बदलायला हवं. त्यासाठी आमच्यासारख्यांनी अधिक लक्ष द्यायला हवं. संसदेचं अधिवेशन संपल्यावर सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत”, असं म्हणत शरद पवारांनी यावेळी या विषयावर सर्वपक्षीय व सर्व बाजूंनी मिळून प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.