डॉ. शीतल आमटे मानसिक तणावात असल्याचे आणि त्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार घेत असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.
चंद्रपूर, दि. ३० डिसेंबर : महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूचे गुढ अद्याप कायम असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जून 2020 मध्येही त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आलीय. डॉ. शीतल आमटे मानसिक तणावात असल्याचे आणि त्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार घेत असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. डॉ.शीतल यांच्या मृतदेहाशेजारी आढळलेल्या इंजेक्शनबाबत देखील पोलिसांनी महत्वाचा खुलासा केलाय. अल्सर झालेल्या कुत्र्यांना संपविण्यासाठी डॉ. शीतल यांनी 3 प्रकारचे इंजेक्शन बोलावले होते आणि त्यातील एक रिकामे अँपुल मृतदेहाशेजारी मिळाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक टॅबलेट, मुद्देमाल, व्हिसेरा ताब्यात घेतला आहे. या सर्व वस्तू रासायनिक परिक्षणकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपूर व नागपूर या ठिकाणी पाठविल्या आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी पाठविल्या आहेत. या दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार श्वास रोखल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद आहे. या मृत्यू प्रकरणात प्रथम दर्शनी पुराव्यावरून घातपात दिसून आलेला नाही असेही साळवे यांनी सांगितले.