३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाहीतर, आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानास दिला आहे.
शिर्डी, दि. १० डिसेंबर : साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थानने केलेले आहे. साई मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहेत. साई संस्थानच्या याच आवाहनावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना आज सकाळी पुण्याहून शिर्डीकडे जाताना, नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ पोलिसांनी रोखलं आणि ताब्यात घेतलं होतं. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात. यावर अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही, असं तुप्ती देसाईंनी म्हटलं होतं. ३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाहीतर, आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानास दिला आहे.