शारदा ही अकरावीत शिक्षण घेत होती. घर सारवत असताना अचानक सापाने शारदाला दंश केला. काहीतरी चावल्याने शारदाने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले.
पुरोगामी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे; उपचाराऐवजी मांत्रिकावर भरजळगाव, पुणे, दि. २३ फेब्रुवारी : पुणे आणि जळगाव जिल्ह्यात दोन तरुणींचा अंधश्रद्धांनी बळी घेतला. पुरोगामी महाराष्ट्राच्या अबु्रची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली. दोन्ही तरुणींवर औषधोपचार करण्याऐवजी त्यांच्यावर मांत्रिकाचे उपचार केल्याने त्यात त्यांचा बळी गेला. त्यातील एक महिला तर गर्भवती होती. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात अंधश्रद्धेमुळे एका 17 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला. वनकोठे गावात आदिवासी कुटुंबातील शारदा रामचंद्र भिल असे या युवतीचे नाव असून घर सारवत असताना तिला अचानक सापाने दंश केला; मात्र कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात न नेता देव ठाण्यावर नेले. अंधश्रद्धेमुळे अखेर शारदाला आपला जीव गमवावा लागला. पुरोगामी महाराष्ट्रात आज ही अंधश्रद्धेला खतपाणी दिले जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शारदा ही अकरावीत शिक्षण घेत होती. घर सारवत असताना अचानक सापाने शारदाला दंश केला. काहीतरी चावल्याने शारदाने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले. काहीजणांनी सर्प चावलेल्या भागावर विष शरीरात पसरू नये, म्हणून सर्पदंश केलेल्या दोन ठिकाणी पट्टीने घट्ट बांधले; मात्र शारदाच्या पालकांनी शारदाला उपचारासाठी दवाखान्यात न नेता अमळनेर तालुक्यातील कान्हेरे फाफोरे येथे एका बाबांच्या ठाण्यावर सर्पाचे विष उतरवण्यासाठी नेले. शारदाला दिवसभर ठेवल्यानंतर उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला वनकोठे येथे परत घरी आणले; परंतु तोपर्यंत शारदाची शुद्ध हरपली होती. गावातील सरपंच व सुज्ञ नागरिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शारदाला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी शारदाला मृत घोषित केले. अंधश्रद्धेमुळे पुण्यातील मावळमध्ये एका 21 वर्षीय गरोदर तरुणीचा बळी गेला आहे. दीपाली बिडकर असे या तरुणीचे नाव असून एप्रिल महिन्यात तिचा विवाह महेश बिडकर याच्याबरोबर झाला होता. या प्रकरणी दीपालीचा भाऊ संतोष मगर याने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आठ महिन्यांच्या गरोदर दीपालीला अचानक त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी सासरच्या लोकांनी मांत्रिकाला बोलावले. बाहेरची बाधा झाली असल्याचे सांगून दीपालीच्या सासरच्या लोकांनी तिला दवाखान्यात घेऊन जाण्यास नकार दिला. त्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दीपालीच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने पुन्हा मांत्रिकाला बोलविण्यात आले. त्या वेळी लिंबू उतरवून टाकण्याचा सल्ला देण्यात आला; मात्र तरीदेखील दीपाली शुद्धीवर न आल्याने तिला उपचारासाठी डॉक्टरकडे नेण्यात आले. तोपर्यंत दीपाली व तिच्या बाळाचा मृत्यू झाला.दीपालीचा पैशासाठी छळविवाहानंतर दीपालीचा पती महेश, सासू जिजाबाई, सासरा रघुनाथ, दीर मोहन, जाऊ बकुळा यांनी माहेराहून पैसे आणि विविध वस्तू आणण्याचा तगादा लावला होता. दीपालीला पतीदेखील वारंवार मारहाण करत होता. ही बाब दीपालीने आईला सांगितली; मात्र नंतर पैसे आणि वस्तू देऊ असे सांगून तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले होते; परंतु तिची ती माहेरची भेट अखेरची ठरली.