मनसेच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली.
चंद्रपूर, दि. २२ : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. त्याआधी राज ठाकरे मराठावाड्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, आज चंद्रपूर दौऱ्यात मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राज ठाकरेंच्या बैठकीतून बाहेर पडताच मनसेच्या दोन गटात राडा झाला आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि दुसरे इच्छुक चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हा जोरदार राडा झाला आहे.मनसेच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. उमेदवारी घोषित केल्यानंतर संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडताच सभेच्या ठिकाणी गोंधळ घालत खुर्च्यां एकमेकांवर फेकून तोडफोड केली. या राड्याची राज ठाकरे यांनी दखल घेतली असून या सगळ्या प्रकारानंतर राज ठाकरे यांनी गोंधळ घालणाऱ्या चंद्रप्रकाश बोरकर यांना पक्षातून निष्कासित केलं आहे. पक्षात अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. असे वागणाऱ्यांवर अशाच पद्धतीने कारवाई होईल, असे पक्षाचे सरचिटणीस राजू उंबरकर यांनी सांगितलं.