IMG-LOGO
महाराष्ट्र

एक व्रतस्थ, ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Saturday, Dec 19
IMG

संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते.

नागपूर, दि. १९ डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल ट्विट करत मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल ट्विटमध्ये म्हटले आहे कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते. 'नागपूर तरुण भारत'चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद मिळाले आहेत. खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.

Share: