वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
ब्रिजटाउन, दि. २२ : यजमान वेस्ट इंडिजने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सहयजमान अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला असून सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अकेल हुसेन, गुदकेश मोटी आणि रॉस्टन चेस या फिरकी त्रिकुटाभोवती वेस्ट इंडिजने आक्रमण केंद्रित केलं होतं. अमेरिकेच्या फलंदाजांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांनी अर्धशतकही फलकावर नोंदवलं मात्र यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. अमेरिकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. अँड्रियस गौसने २९ तर नितीश कुमारने २० धावांची खेळी केली. कर्णधार आरोन जोन्स आणि अनुभवी कोरे अँडरसनकडून अमेरिकेला मोठ्या अपेक्षा होत्या पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. रॉस्टन चेसने १९ धावात ३ तर रसेलने ३१ धावात ३ विकेट्स पटकावल्या. अल्झारी जोसेफने त्यांना चांगली साथ दिली. अमेरिकेचा डाव १२८ धावातच आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करत वेस्ट इंडिजने १०.५ षटकात सामना संपवत विजय संपादन केले. या विजयासोबतच वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या डोखेदुखीत वाढ केली आहे तर वेस्ट इंडिजला मात्र एक फायदा झाला आहे. या सामन्यातील परभावामुळे अमेरिका आता वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे.