येत्या वर्षभरात राज्यात 15 मोठ्या महापालिका आणि 27 जिल्हा परिषदा आणि शंभरच्या घरात नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी : राज्यातील सत्तेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राबवण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील पक्षांनी कंबर कसली आहे. शक्य असेल त्या महापालिका आणि जिल्हा परिषदेत एकत्र येऊन महाविकास आघाडीतील तीन किंवा दोन पक्ष आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. येत्या वर्षभरात राज्यात 15 मोठ्या महापालिका आणि 27 जिल्हा परिषदा आणि शंभरच्या घरात नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव अजेंडा डोळ्यासमोर ठेवून ही महाविकास आघाडी स्थापन झाली. जर हे तीन पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येऊ शकते, याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही आली. त्यामुळेच भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत.ज्या महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत सध्या जो पक्ष क्रमांक एकवर असेल, त्याच्या नेतृत्वाखाली ती महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवली जाणार आहे. जसे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, त्यामुळे तिथे राष्ट्रवादीला महत्त्व दिले जाणार आहे. राज्यात 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवले. येत्या वर्षभरात होणा-या 15 महापालिकांपैकी पाच महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. नवी मुंबईत भाजपची सत्ता आहे. कोल्हापुरात महाविकासआघाडीची सत्ता आहे. वसई-विरार बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची, तर औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. उरलेल्या 10 महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार असून 10 पैकी तब्बल आठ महापालिका भाजपकडे आहेत. यात पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, अकोला, अमरावती, सोलापूर, उल्हासनगर यांचा समावेश आहे, तर शिवसेनेकडे मुंबई आणि ठाणे या दोन महापालिका आहेत.महापालिका आणि जिल्हा परिषदेतील भाजपचे हे वर्चस्व मोडण्यासाठीच एकत्र निवडणूक लढवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. काही ठिकाणी आघाडीत बिघाडीराज्यातील सत्तेप्रमाणे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येणार असले, तरी काही ठिकाणी आघाडी होण्याची शक्यता अवघड आहे. कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष वेगळे लढणार असल्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही; मात्र जिथे भाजप वरचढ आहे, तिथे आघाडी करूनच निवडणूक लढवली जाणार आहे.