IMG-LOGO
महाराष्ट्र

थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

Monday, Jan 04
IMG

थोरात यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे आता त्यांचा राजीनामा स्वीकारून महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलणार, का याची उत्सुकता आहे.

काँग्रेसच्या नेत्यांत स्पर्धा; वडेट्टीवर, सातव, चव्हाण यांची नावे चर्चेत मुंबई, नवी दिल्ली, दि. ४ जानेवारी : काँग्रेसमध्ये मुंबईचा अध्यक्ष बदलल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू होती. बाळासाहेब थोरात हे सध्या राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून आज दिल्लीत त्यांनी पक्ष संघटनेतल्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन आपली भूमिका कळवली आहे. थोरात यांनी हे पाऊल नेमके का उचलले? त्यांचा राजीनामा मंजूर होणार का? नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार? या मुद्द्यांवर आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शह देणारा नेता प्रदेशाध्यक्षपदी असावा, असे नियोजन असून विजय वडेट्टीवार, राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.  थोरात यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे आता त्यांचा राजीनामा स्वीकारून महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलणार, का याची उत्सुकता आहे. थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद येऊन अवघे दीड वर्ष झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सन्मानजनक 44 जागा मिळाल्या, सत्तेत सहभागाची संधी मिळाली; पण तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेस कुठे दिसत नाही. काँग्रेसला दुर्लक्षित केले जात असल्याची टीका त्यांच्यावर सुरू झाली. थोरात यांच्याकडे एकाचवेळी महसूलमंत्रिपद, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपद अशी तीन पदे आहेत. शिवाय त्यांचे भाचे सत्यजीत तांबे हेच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होत असल्याचा काँग्रेसमधल्या एका गटाचा आरोप आहे. मध्य प्रदेश, राजस्थानात एकाच व्यक्तीकडे प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद काँग्रेसने बराच काळ ठेवले होते. त्यामुळे या केवळ एकाच मुद्द्यावर थोरात यांच्या विरोधात कॅम्पेन यशस्वी होऊ शकत नाही; पण तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसचे महत्व अधोरेखित करण्यासाठी नवे प्रभारी एच. के. पाटील काही नवा बदल करतात हे पाहणे त्यामुळे महत्वाचे आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेदेखील विधानसभा अध्यक्षपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदात रस दाखवत होते. विदर्भातील इतरही अनेक प्रबळ दावेदार सातत्याने पुढे येत आहेत. सध्या तरी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनुभवी नेत्यांना संधी?राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडण्याची शक्यता असून सातव, चव्हाण आणि पटोले यांच्यापैकी एका नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

Share: