महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता.
पुणे, दि. २३ फेब्रुवारी : कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या शाही लग्न सोहळ्याची चौकशी होणार आहे. पुण्यात रविवारी झालेल्या लग्न सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसले. महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता. याबाबत मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. कोरोनासंबंधी नवे नियम आजपासून (सोमवार 22 फेब्रुवारी) लागू होणार असले, तरी आधीच्या नियमावलीनुसार शंभर जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे बंधन होते.धनंजय महाडिक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांच्या लग्नाला शंभरपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनेक पाहुण्यांनी लग्नात मास्क घातले नव्हते; परंतु केवळ मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस बजावली जाणार असून महाडिक किंवा अन्य कोणावर कारवाईचा अद्याप उल्लेख नाही. महाडिक यांनी 2004 मध्ये कोल्हापूरमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून महाडिकांचा पराभव झाला होता. त्यानंतर शिवसेनेला अलविदा करत महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला; परंतु 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेनसे त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली; मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. महाडिक यांना 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले आणि त्यांनी लोकसभा गाठली; परंतु 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय सदाशिवराव मंडलिक यांनी महाडिकांना त्यांच्याच मतदारसंघात धूळ चारली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्या वेळी महाडिक यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.