इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. पेट्रोलमध्ये मिसळून गाड्यांमधील इंधनाच्या स्वरूपात त्याचा वापर करता येतो. इथेनॉलचे उत्पादन आतापर्यंत मळीपासून घेतले जात होते.
केंद्र सरकारचा निर्णय; इंधन आयात कमी करण्यावर भरनवी दिल्ली, दि. ३० डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथेनॉलच्या उत्पादनासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला. इथेनॉलच्या उत्पादनावर अनुदान वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. सरकार इथेनॉल उत्पादनावर कंपन्यांना अनुदान देणार आहे. त्याशिवाय धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. आता उसाशिवाय तांदूळ, मका, गव्हापासून इथेनॉल तयार केले जाऊ शकते. इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. पेट्रोलमध्ये मिसळून गाड्यांमधील इंधनाच्या स्वरूपात त्याचा वापर करता येतो. इथेनॉलचे उत्पादन आतापर्यंत मळीपासून घेतले जात होते. या वर्षी प्रथमच थेट उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला आणि आता धान्यापासून इथेनॉल तयार करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारादीप बंदराच्या विकासाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. सरकारने पीपीपी मॉडेलअंतर्गत तीन हजार चार कोटी 63 लाख रुपयांच्या मल्टिलेव्हल पोर्ट तयार करण्याला मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, की कृषी उत्पादनापासून तयार होणारे इथेनॉल वापरून इंधन तयार करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शेतकर्यांना वेळेवर भरपाई मिळणार आहे. कच्च्या तेलाची आयातही घटणार आहे. सरकारने 2022 पर्यंत पेट्रोलबरोबर 10 टक्के इथेनॉल मिसळणे आणि 2030पर्यंत 20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सरकारच्या निर्णयानंतर आता उसाशिवाय धान्य म्हणजेच तांदूळ, गहू, मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. इथेनॉल उत्पादन वाढवल्यामुळे पेट्रोलियम पदार्थांवरच्या आयातीचा भार कमी होणार आहे. भारत घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष जवळपास आठ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल-डिझेल आयात करतो. पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे कच्या तेलाची आयात कमी होणार आहे.