‘१४ तारखेला फलटणला बोलावलंय! समजलं का?,’ असं शरद पवार म्हणाले.
इंदापूर, दि. ७ : अजित पवार यांच्या पक्षात असलेले माजी मंत्री व विधान परिषदेचे माजी उपसभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. खुद्द शरद पवार यांनीच इंदापूरच्या सभेत ही बातमी दिली. ‘१४ तारखेला फलटणला बोलावलंय! समजलं का?,’ असं शरद पवार म्हणाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्यासह पक्षाच्या सर्व मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना शरद पवार यांनी निंबाळकर यांच्या प्रवेशाचीही बातमी दिली. ‘राज्यातील राजकीय चित्र सध्या बदलतंय. आज ह्या कार्यक्रमासाठी घरून निघायच्या वेळेला आणखी एका ठिकाणाहून फोन आला. त्यांनी हट्ट केला की आज इंदापूरला चाललाय, १४ तारखेला आमच्याकडं आलंच पाहिजे. काय कार्यक्रम काढलाय असं मी विचारलं तर ते म्हणाले, इंदापूरला आहे तोच कार्यक्रम आमच्याकडं आहे. म्हटलं कुठं? तर ते म्हणाले फलटणला,' असं शरद पवार म्हणाले. हे सांगताना त्यांनी उपस्थितांना उद्देशून समजलं का? असा प्रश्नही केला. 'हर्षवर्धन पाटलांचं मन इकडं होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला, पण तो निर्णय झाला. याचा मला आनंद आहे. हा निर्णय फक्त इंदापूरपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या ऊसाच्या धंद्याला मदत करणारा हा निर्णय आहे. राज्याच्या समाजकारणाला शक्ती देणारा निर्णय आहे, असं शरद पवार म्हणाले.आम्ही काही मागण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी पक्षात आलो नाही. आम्हाला काहीही काम द्या, असं हर्षवर्धन पाटील आपल्या भाषणात म्हणाले होते. तोच धागा पकडून शरद पवार म्हणाले. तुम्हा सगळ्यांच्या मनात काही गोष्टींच्या बद्दल स्पष्टता आहे की नाही माहीत नाही. काहीही काम द्या असं सगळे म्हणतायत. काहीही काम द्या. काहीही काम करण्यासाठी हर्षवर्धनची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल असं काम त्यांच्याकडं द्यायची आहेत. पण त्यासाठी पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.