अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही.
मुंबई, दि. १ : मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. एक तर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर इशारा दिला आहे. तसंच हात उगारला त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही, आदेश पाहिजे तर आदेश देतो असंही ते म्हणाले आहेत. आता या वक्त्याव्यावर राजकारण सुरु झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आधी पक्ष वाचवावा, उरली सुरलेली शिवसेना वाचवावी आणि नंतर दिल्ली पाहावी”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. “राजकारणात अशी भाषा बोलणं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसतं आहे. हे खरं म्हणजे वैचारीक दिवाळखोरी आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राने याआधी पाहिलेलं नाही. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.