केंद्रातील मोदी सरकार अत्यंत निर्दयी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे.
मुंबई, दि. १२ जानेवारी : केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतक-यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतक-यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 16 तारखेला ’राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला.केंद्रातील मोदी सरकार अत्यंत निर्दयी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतक-यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत, ही शेतकर्यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतक-यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्र लागू केले जाणार नाहीत, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूटत आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, या मागणीसाठी 16 तारखेला आंदोलन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.थोरात म्हणाले, की मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग केला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये सतत दरवाढ करून नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने 73 वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे 2014 मध्ये पेट्रोलवर असलेली 9.20 रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षात मोदी सरकारने 32.98 रुपये केली आहे, लिटरमागे 23.78 रुपयांची वाढ म्हणजे तब्बल 258 टक्के वाढ, तर डिझेलची मे 2014 मध्ये असलेली 3.46 रुपये एक्साईज ड्युटी आज 31.83 रुपये केली म्हणजे प्रति लिटर 28.37 रुपये आणि 820 टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे जगात कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रतिपिंपावरून 50 डॉलर प्रतिपिंप एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे. इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत 19 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे.सरकारला जागे करण्यासाठी संघर्षशेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला असून 16 जानेवारीला ’किसान अधिकार दिवस’ पाळत आंदोलन केले जात आहे. भाजपच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे. लोकशाही मूल्ये व संविधानाला पायदळी तुडवत लहरी कारभार सुरू आहे. काँग्रेस पक्ष या जुलमी सरकारविरोधात याआधीही रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे आणि यापुढेही भाजप सरकारला जागे करण्यासाठी संघर्ष करत राहू, असे थोरात यांनी सांगितले.