तिसर्या लाटेत मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास सरसकट मुलांवर उपचार केल्यास मुलांसाठी ते धोकादायक राहणार आहे.
ठाणे, दि. ७ मे : ठाण्यात दुसर्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला. यात काही लहान मुलांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसर्या लाटेची शक्यता आणि त्याचा फटका लहान मुलांना बसणार असल्याने प्रसंगावधान म्हणून ठाणे पालिकेच्या हद्दीत असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालयात शंभर सुसज्ज बेड हे ’चाईल्ड कोरोना’ म्हणून आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांच्या कोरोना उपचारात मोठी मदत होणार आहे. तिसर्या लाटेत मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास सरसकट मुलांवर उपचार केल्यास मुलांसाठी ते धोकादायक राहणार आहे. शंभऱ बेड रुग्णालयात अलिप्त ठेवल्यास मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबीयांतील एक व्यक्ती सोबत राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या उपचारासाठी तैनात असलेल्या कर्मचारी यांचा ताण कमी होईल आणि मुले लवकर कोरोना मुक्त होतील, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. असे असले, तरी ठाण्यात लसीकरणवर ब्रेक लागला आहे. कारण लसींचा शून्य साठा उपलब्ध आहे, केंद्राने याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्राला लस द्यावी, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळू लागल्याने अशा बालकांवर उपचारासाठी पहिले कोविड हॉस्पिटल पंढरपूरमध्ये सुरू होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय देण्याची भूमिका घेतल्याने आता अशा लहान चिमुरड्यांचा प्रश्न सुटणार आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीयतज्ज्ञांचा अंदाज आहे.