कोविडमध्येदेखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील नऊ लाख 55 हजार रुग्ण कमी असते.
मुंबई, दि. २ मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. विधासभेच्या सभागृहामध्ये सरकारवर हल्लाबोल करताना फडणवीस यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारला कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवायला अपयश आल्याचे सांगत योग्य नियोजन केले असते, तर राज्यामधील 30 हजार रुग्णांचे प्राण वाचू शकले असते असे ते म्हणाले. कोविडमध्येदेखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील नऊ लाख 55 हजार रुग्ण कमी असते. तसेच कोरोनामुळे मरण पावलेल्या 30 हजार 900 कोरोना रुग्णांना महाराष्ट्र वाचवू शकला असता असे अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न फडणवीस यांनी सरकारला विचारला. सगळ्यात मोठे रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचे सांगण्यात आले; पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला, असा आरोप त्यांनी केला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर 60 लाख रुपये खर्च केले. 1200 रुपयांचे थर्मामीटर 6500 रुपयांत खरेदी केले. दोन लाखांच्या बेडशीटसाठी 8.5 लाख भाडे दिले. पंख्याचे 90 दिवसांचे भाडे नऊ हजार दिले. हजार प्लॅस्टिक खुर्च्यांचे भाडे चार लाख रुपये. लाकडाचे 150 टेबलचे भाडे सहा लाख 75 हजार रुपये. काय काय घोटाळे सांगायचे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. हा रेकॉर्ड वेळेतील भ्रष्टाचार आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. मृतदेहांच्या बॅग, पीपीई किटचाही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केली. घोटाळा समोर आणला, तर प्रेताच्या टाळूवरचे लोणी या शब्दाचा अर्थ कळेल अशी टीका त्यांनी केली.