कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. याच निमित्ताने यंदाही पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे, दि. २३ डिसेंबर : पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एल्गार परिषदेला सर्वांगीण अभ्यास करूनच परवानगी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे केली आहे. त्यामुळे पुण्यात ऐन कोरोनाच्या काळात एल्गार परिषदेवरून वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तरीही पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली आहे. एल्गार परिषदेच्या संयोजकांवर पूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा येथील चार वर्षांपूर्वींच्या दंगलीप्रकरणी अनेक जण अजूनही आरोपांच्या पिंजर्यांत आहेत. ब्राम्हण महासंघाने या परिषदेला विरोध केला आहे. याबाबत दवे म्हणाले, की पहिल्या एल्गारची जेव्हा जाहिरात केली जात होती. भित्तीपत्रके, बॅनर लावले जात होते. त्यावरील मजकूर वाचून त्यातून जातीय भावना दुखावल्या जाण्याची भीती आम्ही त्या वेळीही व्यक्त केली होती. या परिषदेला परवानगी देऊ नये, अशी विनंती आम्ही शासनाकडे त्या वेळीही केली होती. पुन्हा एकदा एल्गारची तयारी होत आहे. आयोजक, वक्ते, विचार हे सर्व जर तेच असतील, तर पुन्हा त्या व्यासपीठावरून त्याच त्याच भूमिका मांडल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी शासनाने सर्व बाबी तपासूनच त्यास परवानगी द्यावी. भाषणास चौकट घालून बंदिस्त करता येत नाही, बोलणारा बोलून जातो आणि रेकॉर्डिंग मागवले आहे, चौकशी करू हे सरकारी उत्तर ठरलेले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभेचा अधिकार मान्य करून प्रशासनाने सर्वागीण विचार करूनच परवानगी द्यावी, अशी मागणी दवे यांनी केली आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. याच निमित्ताने यंदाही पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गणेश क्रीडा कला केंद्रात ही परिषद घेण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.कोणत्याही परिस्थितीत परिषद होणारपुण्यातील एल्गार परिषदेला ब्राम्हण महासंघाने विरोध केला असला, तरी कोणत्याही परिस्थिती ही परिषद होणारच असा पवित्रा संयोजकांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जरी परवानगी दिली नाही, तरी आम्ही परिषद घेऊ, असा निर्धार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला.