IMG-LOGO
महाराष्ट्र

पोलिस भरतीचा शासन आदेश रद्द, राज्य सरकारवर नामुष्की; भरती प्रक्रिया सुरूच राहणार

Friday, Jan 08
IMG

चार जानेवारीला गृह विभागाने काढलेल्या आदेशानुसार विशेष आर्थिक मागास (एसईबीसी)च्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल.

मुंबई, दि. ८ जानेवारी  : राज्यातील पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भात चार जानेवारीला गृहविभागाने काढलेला शासन आदेश अखेर रद्द करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. असे असले, तरी भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. अवघ्या तीन दिवसांत शासन आदेश रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. आता सुधारित आदेश काढण्यात येणार आहे.  चार जानेवारीला गृह विभागाने काढलेल्या आदेशानुसार विशेष आर्थिक मागास (एसईबीसी)च्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. अखेर तो आदेश रद्द करण्यात आल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडबल्यूएस) लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता शुद्धीपत्रक काढणार आहे. चार जानेवारीच्या भरतीला एसईबीसीचे आरक्षण गृहीत धरण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मराठा संघटनांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर गृह विभागाने भरतीसंदर्भातील तो शासन आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पोलिस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आली.पोलिस शिपाई भरती 2019 करिता ज्या एसईबीसीच्या मेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या समान्य प्रशासन विभागाकडील 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता त्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून लाभ मिळावा, असा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला होता. एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे, असा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला होता. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला होता.‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार होते. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलिस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती; मात्र नऊ सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती; मात्र गृह विभागाने पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले होते.

Share: