’राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते सातत्याने सरकार पडणार, असे म्हणत आहेत. या अधिवेशनात भाजप पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला.
जयंत पाटील यांची टीका; ऑपरेशन लोटस अपयशी ठरणारमुंबई, दि. १६ : पश्चिम बंगाल व इतर राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर आता महाराष्ट्राचा नंबर असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ’मुनगंटीवार यांचे हे विधान लोकशाही विरोधी आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार लोकांनी निवडून दिलेले हे सरकार आहे. हे सरकार पाडण्याची भाषा विरोधक करत आहेत. विरोधकांनी सरकार पाडण्याची वल्गना करण्यापेक्षा किमान विरोधक म्हणून तरी काम केले पाहिजे,’ असा सल्ला पाटील यांनी दिला आहे. ’राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते सातत्याने सरकार पडणार, असे म्हणत आहेत. या अधिवेशनात भाजप पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला. फडणवीस यांना खात्री झाली आहे, की आपल्याला पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षातच बसायचे आहे. त्यानुसार त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडली. हे त्यांनी नेहमी करावे, विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावरही पाटील यांनी भाष्य केले आहे. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते, त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असे झाले आहे. त्यामुळे काहीही झाले, की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात. हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.