IMG-LOGO
महाराष्ट्र

अशा पद्धतीने कुलगुरूपदावरून हटवणं अत्यंत चुकीचं : राज ठाकरे

Tuesday, Sep 17
IMG

शिक्षकाला त्या व्यवस्थांमध्ये प्रचंड मानसन्मान असतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई, दि. १७ : पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून डॉ. अजित रानडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना ताजी सारख्या आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे यांना अशा पद्धतीने कुलगुरूपदावरून हटवणं अत्यंत चुकीचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी डॉ. अजित रानडे यांच्या समर्थनार्थ आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलीय. ठाकरे लिहितात,'पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने हटवल्याची बातमी गेले दोन दिवस वर्तमानपत्रामधून वाचनात येत आहे. डॉ. अजित रानडेंसारख्या एका उच्चविद्याविभूषित, खाजगी क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केलेल्या व्यक्तीला, अशा पद्धतीने पदावरून हटवणं हे अत्यंत चुकीचं आहे.' असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.  रानडे यांची नियुक्ती करताना ही बाब लक्षात आली नव्हती का? अडीच वर्ष या पदावर राहून त्यांनी जी कामगिरी केली, त्यानंतर अचानक ही आठवण कशी होते? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत, त्या त्या क्षेत्रातील अनुभवी माणसं पुढे अध्यापन क्षेत्रात येतात आणि शिक्षकाला त्या व्यवस्थांमध्ये प्रचंड मानसन्मान असतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.राज ठाकरे लिहितात, 'मी आत्ता अमेरिकेला गेलेलो असताना, तिथल्या अनेकांशी बोलताना, मला जाणवलं की अगदी नोबेल पुरस्कार विजेते, ते एखाद्या अवाढ्यव उद्योग समूहात दीर्घकाळ उच्च पदावर काम केलेला माणूस पुढे विद्यापीठांमध्ये शिकवतो. एखाद्या विद्यापीठाचा प्रमुख होतो. तिथे त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, अनुभव आणि त्या व्यक्तीची कार्यक्षमता हेच निकष बघितले जातात. 'अध्यापन अनुभव' असले काहीतरी फुटकळ निकष लावले जात नाहीत.' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.‘मुळात आपल्याकडचं शिक्षण हे व्यवसाय उद्योगांना पूरक नसतं. याला दोन कारणं मला नेहमी जाणवतात की अभ्यासक्रम तयार करणारे, हे त्या क्षेत्रांत काम केलेले असतातच असं नाही, आणि शिकवणारे पण त्या क्षेत्रातील अनुभवी नसतात. त्यामुळे मुलांना जे शिकवलं जातं, ते पुढे त्यांना बाहेर पडल्यावर उपयोगी पडत नाही आणि त्यांची मग ओढाताण सुरु होते, बेरोजगारांच्या फौजा तयार होतात.’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. डॉ. अजित रानडेंसारखी व्यक्ती स्वेच्छेने शिक्षण क्षेत्रांत उतरते आणि अशा व्यक्तीला पूर्णपणे नाउमेद करणारी कृती सरकारकडून घडणार असेल तर या क्षेत्रांत पुन्हा कुठला तज्ज्ञ आणि धडपड्या माणूस येईल? आणि अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का ?' असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. हा विषय थेट राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नसला तरी राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून यूजीसीने केलेली चूक सुधारलीच पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. शिक्षण क्षेत्रांत फार मूलभूत काम करणं जर शक्य नसेल तर किमान अशा गोष्टींतून चुकीचे पायंडे पडतील आणि समाजातील बुद्धिमान लोकं नाऊमेद होणार नाहीत इतकं तरी सरकारने पहावं, असं ठाकरे म्हणाले. 

Share: