डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करीत थेट विशेष विमानाने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.
प्रतिवादी करण्याचा अर्ज दाखल; उद्या हायकोर्टात सुनावणीनगर, दि. ३ मे : खा. डॉ. सुजय विखे यांनी आणलेल्या बहुचर्चित रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी दिल्लीतून नव्हे, तर चंदीगडमधून करण्यात आली आहे. तसे त्यांच्याद्वारेच औरंगाबाद खंडपीठात सांगण्यात आले आहे. खंडपीठात दाखल असलेल्या खटल्यात प्रतिवादी करवून घेण्याचा अर्जही त्यांच्यावतीने दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करीत थेट विशेष विमानाने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली असून, त्याची सोमवारी सुनावणी झाली.डॉ. विखे यांनी या याचिकेत त्यांना प्रतिवादी बनवावे व त्यांचे म्हणणे ऐकावे अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्यांच्यावतीने असे सांगण्यात आले की त्यांनी 1700 रेमडेसिव्गिर इंजेक्शनचा साठा नियमाप्रमाणे खरेदी केला व त्यातील 1200 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खासगी विमानाने आणला. त्यावर याचिकाकर्ते यांच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला, की या रेमडेसिव्हिर इंजेक्शन साठ्याची गोपनीयता पाळण्यासाठी शासकीय अधिकारी खोटे कागदपत्रे तयार करीत आहेत. एकाबाजूने शासकीय यंत्रणा व डॉ. विखे हे चंदीगड येथून शिर्डी येथे खासगी विमानाने आणलेला रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा एकाच कंपनीचा असल्याचे भासवत आहे; परंतु दुसर्या बाजूने त्यांच्यामार्फत तीन वेगळ्या कंपनीचे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा वितरित करण्यात येत असल्याने त्यांच्याकडे 1700 रेम्डेसिव्हिर इंजेक्शनच्या साठ्याव्यतिरिक्त अजून साठा असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आला. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात असे म्हटले आहे, की रेमडेसिव्हिरचा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खासगी विमानाने आणण्याबाबत त्यांना त्याची काहीएक कल्पना नव्हती. त्यांनी फक्त 1700 रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी करण्याची परवानगी डॉ. विखे व त्यांच्या हॉस्पिटलला दिली होती. या इंजेक्शन साठ्याची नोंद नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आहे. दरम्यान, प्रधान सचिव, गृह विभाग, मुंबई व नगरच्या पोलिस अधीक्षकांनी खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या खोक्याबद्दलचा अहवाल न्यायालयात सादर केला. उच्च न्यायालयाचे न्या. आर. व्ही. घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी या प्रकरणाची सुनावणी 5 मे रोजी ठेवली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रज्ञा तळेकर, अॅड. अजिंक्य काळे, अॅड. उमाकांत आवटे व अॅड. राजेश मेवारा काम पाहात आहेत, तर शासनाच्यावतीने अॅड. डी. आर. काळे काम पाहत आहे.अन्य नेत्यांच्या खरेदीचीही चौकशीयाचिकाकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांच्यावतीने या याचिकेमध्ये दुरुस्ती अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी राजकीय लोकांनी- जसे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शरद पवार व रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांनी कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वाटप केल्याबद्दल कार्यवाही करावी अशी विनंती या दुरुस्ती अर्जात केली आहे. त्याची सुनावणीदेखील पाच मे रोजी होणार आहे.