देशभरात सरकार कुणाचंही असो महिलांना सुरक्षिततेची हमी देण्यास कमी पडत आहे
कोल्हापूर, दि. २३ : कोलकाता येथील घटनेतील सर्व आरोपी अद्याप पकडले गेले नाहीत. उरण येथील घटना ताजी आहे. याशिवाय नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहावीत ९६ टक्के मिळविलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीने विकृत मेकॅनिक मुलाच्या अघोरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अशातच आता बदलापूर येथील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. देशभरात सरकार कुणाचंही असो महिलांना सुरक्षिततेची हमी देण्यास कमी पडत आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.“देशभरात आज विकृती वाढीस लागली आहे. आरोपींना वेळीच पकडले जात नाही. पकडले तरी कठोर शिक्षा होत नाही. कित्येक तर निर्दोष सुटून जातात. देशात कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी लोकांनीच कठोर भूमिका घेतली, तर सरकारने आणि समाजातील बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये”, असा इशाराही त्यांनी दिला.