साई संस्थानकडून रोज 12 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. त्यात आठ हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर चार हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत.
शिर्डी, दि. २८ डिसेंबर : नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीला साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दिल्लीतील काही महिला भाविकांना साई मंदिरात आरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगीची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला. साईबाबांच्या आरतीसाठी 25 हजार रुपये देणगी देण्याची मागणी केली, असा या महिलांचा आरोप आहे. देणगी काऊंटरजवळ देणगीचे आवाहन करणारे आणि देणगीदारांना कोणत्या सुविधा मिळतील, याबाबत फलक लावण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात फक्त 50 भाविकांना आरतीसाठी प्रवेश दिला जात आहे; मात्र फक्त देणगीदारांनाच आरतीला प्रवेश मिळत असल्याचा आरोप भाविकांनी आणि काही स्थानिक नागरिकांनीही केला आहे. दरम्यान, भाविकांकडून झालेल्या या आरोपाबाबत साई संस्थानकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. रविवारी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये भक्तांची मोठी गर्दी झाली होती. सलग तिसर्या दिवशी गर्दीचा आलेख वाढता आहे. दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांत 30 हजारांहून अधिक भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. रविवारी दुपारपर्यंत तब्बल 10 हजार भाविकांनी साईंचे दर्शन घेतले होते. ऑनलाईन पास व्यवस्थेपेक्षा ऑफलाईन दर्शन पास घेण्यावर साईभक्तांचा भर असल्याचे दिसून येत आहे. साईबाबा यांच्या मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली आहे. अनलॉकनंतर आतापर्यंत रोज सहा हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळत होती; पण आता रोज 12 हजार भाविक साईंचे दर्शन घेऊ शकणार आहेत. साईंच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहनही साई संस्थानकडून करण्यात आले आहे. साई संस्थानकडून रोज 12 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. त्यात आठ हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर चार हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत. 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुले ठेवायचे की नाही, याबाबत मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.