IMG-LOGO
महाराष्ट्र

समुद्रावरील जोरदार वाऱ्यामुळे माजी राज्यपाल कोश्यारींची टोपी; उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

Wednesday, Aug 28
IMG

राजकोट किल्ल्यावर घडलेला प्रसंग दुर्दैवी असून यामागे भाजपाचे गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप तीनही नेत्यांनी केला.

मुंबई, दि. २८ :  सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिन ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकारण पेटले आहे. मातोश्री येथे आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. या घटनेवर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी समुद्रकिनारी असलेल्या राजभवनावर राहत होते. त्यांची टोपी कधी उडाली नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे राजकोट किल्ल्यावर घडलेला प्रसंग दुर्दैवी असून यामागे भाजपाचे गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप तीनही नेत्यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले कारण अतिशय निर्लज्जपणाचे आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे समुद्रकिनारी असलेल्या राजभवनावर राहत होते. त्यांनीही महाराजांचा अपमान केला होता. पण समुद्रावरील जोरदार वाऱ्यामुळे माजी राज्यपाल कोश्यारींची टोपी उडाली, असे माझ्या तरी वाचनात कुठे आले नाही. असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नौदलावर जबाबादारी ढकलण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला आहे. आपले नौदल इतके पोकळ नाही. त्यांना समुद्रकिनारी वाहणाऱ्या वाऱ्याचा अंदाज असतो. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि कोकण जिंकायचे या ईर्षेने घाईघाईत तो कार्यक्रम मालवण येथे घेण्यात आला. तसेच शिल्पकाराबद्दल माहिती समोर आली आहे. नवख्या शिल्पकाराकडून ठराविक वेळात पुतळा करून घेण्याचा दबाव टाकला गेला. समुद्रकिनारी पुतळा उभारताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, याचा अभ्यास केला गेला नाही, अशीही भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

Share: