तब्बल 12 तासानंतर गुन्हा दाखल केला गेला. या घटनेनंतर बदलापुरात संताप व्यक्त केला जातोय.
बदलापूर, दि. २० : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. तब्बल 12 तासानंतर गुन्हा दाखल केला गेला. या घटनेनंतर बदलापुरात संताप व्यक्त केला जातोय. बदलापूर पूर्वेला एक नामांकित शाळा आहे. बदलापुरातली सर्वात मोठी शाळा म्हणून याशाळेचे नाव घेतलं जातं. या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात होत्या. त्यावेळी शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हती. त्यावेळी तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली. या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही. तक्रार घ्यावी असा कुटुंबीयांचा आग्रह होता. पण पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पिडीत मुलींच्या कुटुंबीयांनी केला आहे. मंगळवारी सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तर यात हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.