हे सरकार काही झाले तरी घालवायचे आहे असेही ते म्हणाले.
मुंबई, दि. २४ : महाविकास आघाडीने पुकारलेला बंद हा महिलांच्या सुरक्षेसाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी होता. झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी हा बंद होता. पण सरकारने ते होवू दिला नाही. त्यांना राख्या बांधून घ्यायच्या होत्या. त्यात अडचण येवू नये म्हणून आपल्या चेल्याचपाट्यांना कोर्टात पाठवलं. एकीकडे कंस मामा राख्या बांधत फिरतायत, दुसरीकडे बहिणीवर अत्याचार होत आहेत, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. बंद कडकडीत झाला असता. याची जाणिव सरकारला झाली त्यामुळेच त्यांनी तो होवू दिला नाही. हे मुडदाड सरकार आहे. त्यांनी नराधमाच्या विरूद्ध उभे राहाण्या ऐवजी ते त्यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांचा बंदला विरोध होता असा आरोपही त्यांनी केला. हे सरकार काही झाले तरी घालवायचे आहे असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोर्टाला धन्यवाद देत चिमटेही काढले. आमचीही केस कोर्टात गेली दोन वर्षापासून सुरू आहे. त्यावर अजूनही काही निर्णय आलेला नाही. पण बंदच्या केसमध्ये कोर्टाने तात्काळ निर्णय दिला. त्यांचे त्याबद्दल आभार मानतो. कोर्ट इतक्या जलद गतीने हलू शकते ही ही या निमित्ताने समजले असे ठाकरे म्हणाले. कोर्ट तात्काळ निर्णय घेवू शकतं हे या निमित्ताने सांगितले. आम्हाला मात्र तारीख पे तारीख मिळत आहे हे सांगायला ते यावेळी विसरले नाहीत.