IMG-LOGO
महाराष्ट्र

आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं : उद्धव ठाकरे

Tuesday, Jul 30
IMG

आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबई, दि. ३० : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यावरून टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान दिले होतं. यावेळी त्यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धारावी पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, 'धारावीकरांना मुलुंड, दहिसर चेक नाका किंवा मिठागर, कुर्ला मदर डेअरीत टाकायचा डाव आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. विकासकाची जर तिथे जमीनी असतील तर जिथे त्यांनी ट्रान्सिट कॅम्प बांधावे. पण धारावीकरांना घर हे धारावीतच मिळायला पाहिजे. धारावीकरांना बेघर होऊन मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही.''आदित्य ठाकरे यांनी रस्ता घोटाळ्याचा विषय मांडला. म्हणजे लाडका कॉन्ट्रेक्टर ही त्यांची नवी योजना आहे. मुंबै बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावर टाकला गेला आणि काही मिनिटांतच तो जीआर मागे घेतला. आता तो जीआर मागे घेतला आहे की कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गपचूप कारभार केला गेलेला आहे. रात्रीस खेळ चाले तसा रात्रीच्या भेटीगाठीसारखा हा काही कारभार आहे का?,' असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

Share: