आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं? तो निर्णय सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करु, असे ते म्हणाले.
नांदेड, दि. ३१ : अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भाजपसह महायुतीमधील अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच नवनीत राणांच्या नावाला विरोध केला होता. आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे. महायुतीतील आमची लढत ही मैत्री पूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीने घ्यावा. आमची आणि त्यांची लढत त्यांच्या विरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं? तो निर्णय सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करु, असे ते म्हणाले. नवनीत राणा यांच्या बद्दलचा 100 पानाचा हायकोर्टाचा निकाल आहे.. सगळी बनवाबनवी झालेली आहे, असे त्यात नमूद आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहापर्यंतचे गुन्हे दाखल आहेत. असे असताना अडीच वर्षे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही. मग कोर्टात केस पेंडिंग असतानादेखील येथे उमेदवारी दिली जाते. या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. रवी राणांची वागणूक अतिशय राग आणि संताप येणारी आहे. म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असते.आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आहे. मला मंत्रिपद न दिल्याबद्दल काही वाईट वाटत नाही. परंतु, अमरावतीची लोकसभा मात्र आम्ही लढवणारच. आता ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचारांचा झेंडा समाधीनंतरही जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार. आम्ही उमेदवार देणार आणि जिंकवणार. हीच आमची भूमिका आहे. या भूमिकेने आम्हाला खड्ड्यात घातलं तरी चालेल. परंतु, आम्ही मागे हटणार नाही.