IMG-LOGO
विदेश

इराणचा इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; डागली १५० क्षेपणास्त्रे

Wednesday, Oct 02
IMG

इस्रायल, दि. २ : गेल्या सुमारे एक वर्षापासून सुरू असलेल्या हमास-इस्रायल संघर्षात आज इराणने उडी घेतली आहे. इस्रायलने वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धात सुरुवातीला हमास आणि मागील आठवड्यात हिजबुल्लाह संघटनांच्या म्होरक्यांना लक्ष्य करून या संघटनांचे कंबरडे माडले आहे. इराणचे समर्थन असलेल्या हिसबुल्लाहचा प्रमुख नसरल्ला याला इस्रायलने ठार केल्यानंतर चवताळलेल्या इराणने आज इस्रायलला लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यामुळे तेल अवीव शहरात खळबळ माजली असून संपूर्ण इस्रायलमध्ये आपातकालीन सायरन वाजू लागले आहेत. अनेक इस्रायली नागरिकांनी सुरक्षितस्थली पलायन केले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडत आहे. दोन्ही देशांमधील प्रचंड तणाव आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी (israel defence forces) याला दुजोरा दिला असून या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायली नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचे म्हटले आहे. आज संध्याकाळी अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने इस्रायलला इशारा दिला होता की, इराण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याची योजना आखत आहे. इराणने इस्रायलवर १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली असून देशभरात हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आणि बॉम्ब शेल्टरजवळ राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इराणने हल्ला केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इस्रायलने यापूर्वीच दिला आहे. यानंतर इस्रायलही इराणला प्रत्युत्तर देईल, असे मानले जात आहे.

Share: