IMG-LOGO
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार हे ठरलेले होते; उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

Saturday, Apr 20
IMG

सेना आणि भाजपमध्ये सत्तेचं समान वाटप होईल असं शहांसोबत झालेल्या बैठकीत ठरलं होतं

मुंबई, दि. २०  : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक असा दावा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ठाकरेंनी असा दावा केला की, फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करणार होते आणि स्वत: दिल्लीला जाणार होते. फडणवीस यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं असा आरोपही ठाकरेंनी फडणवीसांवर केला.बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेवर हल्ला करता येईल असा त्यांचा समज झाला आणि २०१९ मध्ये हेच केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन असं वचन मी वडिलांना दिलं होतं. सेना आणि भाजपमध्ये सत्तेचं समान वाटप होईल असं शहांसोबत झालेल्या बैठकीत ठरलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख केला. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील अनैसर्गिक आघाड्या व युतीबाबत विचारणा केली असता त्यासाठी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष व अमित शाह यांना जबाबदार धरलं. हे सगळं कुठे सुरू झालं? लोकांना हे माहिती आहे. आम्ही हिंदुत्व व राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षासोबत होतो. भाजपानं आमच्याबरोबर हे का केलं? माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य बघतो. चांगलं चाललं होतं. माझ्या वडिलांचं २०१२मध्ये निधन झालं, तेव्हा मोदी आमच्या घरी आले होते. २०१४मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा भाजपसोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरेंनी सांगितलं की, भाजपनं अनेकदा विश्वासघात केलाय. त्यामुळे पुन्हा त्यांच्यासोबत जायचा प्रश्नच येत नाही. भाजपकडून दिली जाणारी गँरटी ही केवळ पोकळ आहे. आम्ही हिंदुत्त्व आणि देशाच्या मुद्द्यांवर त्यांच्यासोबत होतो. तरीही ते आमच्याशी असं का वागले असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.

Share: