IMG-LOGO
महाराष्ट्र

MNS Gudhi Padwa Rally : राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Wednesday, Apr 10
IMG

उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा.

निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो.अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, माझी भूमिका मी योग्यवेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही. काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... "अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. ते सर्व बाजूला सारून मी महाराष्ट्र दौरा केला आणि माझा पक्ष उभा केला. कारण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही." तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार, त्याचं संगोपन करणार... मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा पेरल्या... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. माझ्या पक्षाच्या चिन्हावर कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका. म्हणे 'ठाकरे' कधीच दिल्लीत गेले नाहीत. काहीजणांना राजकीय इतिहासचं माहित नसतो... स्व. बाळासाहेब १९८० साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं... ह्यात वावगं काय ?मी अमित शहांना भेटल्यानंतर... २०१९ च्या 'लाव रे तो व्हिडीओ' लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणुकीआधी मोदी पंतप्रधान नव्हते ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मी गुजरात पाहिलं आणि तिथल्या पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र अजूनही गुजरातच्या पुढे आहे. पण तेव्हा जे वातावरण उभं झालं होतं त्यात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी आश्वासक वाटत होते. म्हणून ते पंतप्रधान व्हावेत असं म्हणणारा देशातील पहिला राजकीय नेता मीच होतो. त्याप्रमाणे देशानेही कौल दिला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांच्या राज्यकारभारात ज्या त्रुटी आढळल्या त्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यावरही सडकून टीका केली. पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदनाचा ट्विटही सर्वप्राथच मीच केलं... ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात. एक गोष्ट स्पष्टच सांगतो... एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.आज उद्धव ठाकरे , संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला, मला काही वैयक्तिक मिळालं नाही म्हणून नाही. मग उद्धव ठाकरे , संजय राऊतांना मोदींच्या भूमिका अजिबात पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता तेव्हाच माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात. तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात.माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या... तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल.आज निवडणुकीच्या जागावाटपाची जी हाणामारी सुरु आहे ती पाहता विधानसभेला सर्व पक्ष कोथळाच काढतील एकमेकांचा. ह्यासाठी निवडणुका असतात का?मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, "राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल."माझा माझ्या सहकाऱ्यांवर, त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या ह्याच सहकाऱ्यांना घेऊन मला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा.

Share: