IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik Loksabha 2024 : शांतिगिरी महाराज यांचा नाशिकमधून तर दिंडोरीतून माकपतर्फे जिवा गावित यांनी भरला अर्ज

Saturday, Apr 27
IMG

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना अद्यापही महायुतीकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार निश्चित झालेला नाही.

नाशिक, दि. २७ : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी नाशिकसाठी ४७ उमेदवारांनी ८७ अर्ज घेतले तर दिंडोरीसाठी १७ उमेदवारांनी ४० अर्ज घेतले. पहिल्या दिवशी दिंडोरीत माकपतर्फे जिवा पांडू गावित आणि या पक्षाचे डमी उमेदवार म्हणून सुभाष चौधरी या दोघांनी तर नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना अद्यापही  महायुतीकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार निश्चित झालेला नाही.दिवसभरात एकूण ६४ उमेदवारांनी १२७ उमेदवारी अर्ज घेतले. यात नाशिक मतदारसंघासाठी खासदार. गोडसे यांच्यासह, राष्ट्रवादीचे दिलीप खैरे, वंचितचे उमेदवार करण गायकर, माजी महापौर दशरथ पाटील, शांतिगिरी महाराज, सिध्देश्वरानंद सरस्वती, स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, पराग वाजे यांच्यासह एकूण ४७ जणांचा समावेश आहे. दिंडोरीसाठी महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार, माकपचे जिवा पांडू गावित, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यासह १७ उमेदवारांनी अर्ज घेतले. शांतिगिरी महाराज यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ६२ हजाराच्या आसपास आहे. त्यांच्याकडे ७१ लाख ६८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून कुठलेही दागिने व जडजवाहिर त्यांच्याकडे नाहीत. महाराजांची वाहने आणि स्थावर मालमत्तेत मुख्यत्वे गुंतवणूक आहे. जमीन, भूखंड आणि तत्सम मालमत्तेचे आजचे बाजारमूल्य ३८ कोटी, ८१ लाखांच्या घरात असून त्यांच्यावर ७५ हजार रुपयांचे कर्जही आहे.दिंडोरी मतदार संघात गावित यांनी माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक-मुंबई पायी मोर्चा काढणाऱ्या गावितांकडे १९ लाखांची इनोव्हा मोटार आहे. व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या गावितांची मालमत्ता पाच वर्षात जवळपास एक कोटीने वाढली असताना दुसरीकडे सुमारे सात लाखांचे दायित्व कमी झाले. त्यांच्याकडे सध्या दोन कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेचे (अचल) आजचे बाजारमूल्य एक कोटी सात लाखहून अधिक आहे.

Share: