IMG-LOGO
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबत अद्ययावत अवांतर वाचन करा

Thursday, Aug 05
IMG

सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात माता-पित्यांचा सहभाग कसा मिळाला याबाबत भावना व्यक्त करीत आपले यश माता-पित्यांना समर्पित केले.

नीळकंठ गायकवाड यांचे प्रतिपादन; पुस्तक भिशीतर्फे गुणवंतांचा गौरवजळगाव, दि. ५ ऑगस्ट : अभ्यासासोबत गुणवंत विद्यार्थ्यांनी अद्ययावत अवांतर वाचन करून रोज स्वतःची पुनर्निर्मिती केली पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षण उपसंचालक नीळकंठ गायकवाड यांनी केले.भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे भिशी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी (4 ऑगस्ट) येथील शाहूनगर परिसरातील अथर्व पब्लिकेशनच्या कार्यालयात कोविड-19 अंतर्गत शासकीय नियम पाळून उत्साहात झाला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे कोडकौतुक करण्यात आले.निवृत्त शिक्षण उपसंचालक आप्पासाहेब निळकंठ गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, डॉ. विजय बागूल प्रमुख अतिथी होते. सुरुवातीला पुस्तक भिशीचे जिल्हाप्रमुख संयोजक विजय लुल्हे यांनी भिशी स्थापनेची उद्दिष्टे व राबविलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य व पर्यावरणात्मक उपक्रमांची माहिती दिली. दहावीमध्ये 89.4 टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळविणारी ओरिऑन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनी तथा अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक तथा प्रकाशक युवराज माळी यांची कन्या कुमुद माळी हिचा शाल, श्रीफळ व बुके देऊन निवृत्त शिक्षण उपसंचालक नीळकंठ गायकवाड यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच 96.1 टक्के गुण पटकावून रा. मिश्र विद्यामंदिरात (बहादरपूर, ता. पारोळा) प्रथम आलेला विद्यार्थी  तथा भिशी सदस्य प्राथमिक शिक्षक सुदाम बडगुजर यांचा मुलगा प्रफुल्ल बडगुजर याचा शाल, श्रीफळ व बुके देऊन निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात माता-पित्यांचा सहभाग कसा मिळाला याबाबत भावना व्यक्त करीत आपले यश माता-पित्यांना समर्पित केले. सिद्धार्थ नेतकर म्हणाले की, आयुष्य घडविणारे तीन गुरू आहेत. वाचलेली पुस्तके, भेटलेली माणसे आणि आलेले अनुभव. साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनापर्यंत विद्यार्थी वडिलांच्या नावाने ओळखला जातो. नंतर मुलाच्या नावाने वडील ओळखले गेले पाहिजेत, म्हणून विद्यार्थ्यांनी संस्कार व सदाचाराने पदोपदी वागले पाहिजे. भुसावळ हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन धांडे म्हणाले की, गुणवत्तेला कलेची जोड असली की विद्यार्थी कधीही अविचाराने वागून आत्मघात करीत नाही. तीर्थस्वरूप गायकवाड साहेबांच्या हस्ते सत्कार होणे म्हणजे विद्यार्थ्यांचे परमभाग्य, अशी भावना डॉ. विजय बागूल यांनी व्यक्त केली. सत्कारार्थी पाल्यांच्या पालकांतर्फे सुदाम बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मूल्यसंवर्धनाचे महत्त्व सांगितले. अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक तथा प्रकाशक युवराज माळी, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका सौ. संगीता माळी, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, दीपक साळुंके, शरद महाजन इत्यादी उपस्थित होते. विजय लुल्हे यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. बडगुजर यांनी आभार मानले.

Share: