मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी रविवारी (दि. २४) मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलावली होती.
आंतरवाली सराटी, दि. २४ : मराठा समाज मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरणार होता. ते अडचणीचे झाले असते. मराठा समाजाला त्यांची शक्ति दाखवायची असेल तर उमेदवारही तुम्हीच द्या. फॉर्मही तुम्हीच ठरवा. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्यास मराठा मते फुटतील. एका मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय ठेवल्यास मत फुटणार नाही, पुढचा निर्णय ३० तारखेला जाहीर करु. अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी रविवारी (दि. २४) मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलावली होती. मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी बैठक आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. सहा महिन्यापूर्वीचे गुन्हे आता दाखल करत आहेत. त्यावेळी तुम्ही झोपले होते का?, एवढी नाराजी समाजाची घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गरज नव्हती. हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहात असे जरांगे म्हणाले. अटी शर्ती आम्हाला घालायच्या आणि त्यांनी अटी शर्तीच्या बाहेर जाऊन काम करायचं. शेवटी निर्णायक भूमिका घेण्याची जबाबदारी समाजाची असते. आपल्याला आपली लढाई लढायाची आणि जिंकायची सुद्धा आहे. आपण ती जिंकली सुद्धा आहे. समाजाची मन खाली होईल असे एकही पाऊल मी उचलला नाही आणि पुढेही उचलणार नाही. आयुष्यभर जेलमध्ये राहण्याची वेळ आल्यास त्याची देखील तयारी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. फक्त मराठा समाजाचे उमेदवार दिले जाणार नाहीत, तर सर्वच जातीचे उमेदवार दिले जाणार आहेत. मी फक्त त्यांना पर्याय सांगितला आहे. मात्र, राजकारणात मला जायचे नाही, समाजाने सांगितले तरीही मी जाणार नाही असे जरांगे म्हणाले आहेत.