IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

पैसे वाटलेत का ; विरोधकांचे काही बगलबच्चे आरोप करताय, अजित पवार यांचा पलटवार

Tuesday, May 07
IMG

पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

बारामती, दि. ७ : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत असून यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला  बारामती मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यादरम्यान लढत होत आहे. दोन्हीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली असतानाच मतदानाला सुरुवात होण्याच्या काही तास आधी बारामतीत अगदी बँक मध्यरात्रीनंतर सुरु ठेवत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, “हे काम निवडणूक आयोगाचे काम आहे. आजपर्यंत मी सातवेळा विधानसभा आणि एक लोकसभा लढवली आहे. त्यामुळे असे प्रकार करत नाही. कारण नसताना विरोधकांचे काही बगलबच्चे अशा प्रकारचे आरोप करत होते. ते आमच्यावरही आरोप करत आहेत. आम्हीही त्यांच्यावर आरोप करू शकतो. त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केली. ते काहीही आऱोप करत आहेत. तुम्ही स्वत: ती बँक उघडी पाहिली का? जो समोरचा आरोप करतो, त्याच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे. त्यामुळे ते आरोप करत असावेत. माझ्या दृष्टीने त्या आरोपाला काहीही महत्व नाही. त्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरजही मला वाटत नाही”, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी रोहित पवारांना दिले. दरम्यान बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. काल रात्री बारामतीमध्ये बँक मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही सुरु होती असा दावा करणारा एक व्हिडीओही रोहित पवारांनी पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे कारमधून पैशांचा वाटप केलं जात होतं हे दाखवणारे काही व्हिडीओ त्यांनी पोस्ट केले आहेत. या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी थेट अजित पवार गटाचा हात असल्याचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. 'रात्री बारामतीत पैशांचा पाऊस पडला' असा उल्लेखही या पोस्टमध्ये आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा," अशा खोचक कॅप्शनसहीत रोहित पवार यांनी या बँकेची शाखा रात्रीही सुरु होती असा दावा करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी, "निवडणूक आयोग दिसतंय ना?" असा सवालही विचारला आहे. "सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल," असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Share: