नारायण राणे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही पूर्ण ताकदीने नारायण राणेंबरोबर उभे राहू.
रत्नागिरी, दि. १८ : शिवसेना-भाजपाच्या युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र यंदा महायुतीत ही जागा भाजपाने आपल्याकडे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीने केंद्रीय केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर माघार घेतली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने यंदादेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला. मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत आणि रत्नागिरीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदय सामंत म्हणाले, आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी, उद्या (१९ एप्रिल) नारायण राणे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही पूर्ण ताकदीने नारायण राणेंबरोबर उभे राहू. आमचा मतदारसंघ आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा नारायण राणेंबरोबर, महायुतीबरोबर असेल असे म्हटले आहे.